तुम्ही विपश्यना करता
यात माज वाटण्यासारखे काहीच नाही .
असे हे होणारच होते.
बाबासाहेबांच्या कर्तृवाने तुम्ही पदवी घेतली
अन् मस्तपैकी नोकरी बळकावली
गलेलठ्ठ पगार घेत शरीरावर मास वाढवीत राहिले.
वरच्यात तुम्हाला बसता आले नाही
आणि खालच्या मिसळता ?
सकाळ - संध्याकाळ संकरीत कुत्र्याला हगवीत
धुंद जगत राहिले .
आपले भाऊबंद खितपत पडले आहेत याचे कधी भानच नव्हते.
शौकाखातर तुम्ही कार घेतली
पण ; मनातला चोर मन पोरखत होता
पाठदुखीचे बहाणे सांगून फटीचर बांधवांसमोर
उगाच मल्लिनाथी करायचे.
मजलूम बांधवांचे मोर्चे बघून तुम्हाला चुकल्यासारखे वाटायचे
तुमच्या हाती खूप काही असूनही
त्यांच्यासाठी तुम्ही काहीच करू शकले नाही .
(पहा बरं 'त्यांच्यात' कुणी बेरोजगार आहे ?
कसे सांभाळून घेतात आपल्या लोकांना!)
पायाखालची जमीन तुम्हाला सतत घसरताना दिसायची
मुलं व्यवस्थित आहेत
मोठ्या इंजीनिअरने कोकणस्थ घरात आणली.
लहान सॉफ्टवेअर शिकायला फॉरिनला गेला.
मुळीसाठी डॉक्टर पकडून आणला
आमची पोरगी बिचारी भाकरीत मोडत राहिली .
तुमचे सगळे 'आलबेल ' आहे.
एवढ्यात तुमचे पोट फार सुटले
हायब्लडप्रेशरचा कधीमधी त्रास होतो
डायबिटीज यापूर्वीच होते.
मध्यंतरी तुमची छाती दुखली
आणि हार्टअटॅकच्या दहशतीने
तुम्ही वर्ल्ड ट्रेंड सेंटर सारखे
भडाभडा पार कोसळूनच गेले
तुमचे सर्व व्यवस्थित चालेल पण ,
आपले बंधू आहेत त्याच स्थितीत- खितपत .
तुमच्या मनाच्या चोर खूपच 'शातिर'
तुम्हालाही सोडत नाही
सतत पोरखत असतो घुशीसारखा .
म्हणून तुम्हाला विपश्यने शिवाय पर्याय नाही.
यात लाज वाटण्यासारखे काही नाही.
तुम्ही नोकरीतून रिटायर्ड काय झाले
तुमची दुनियाच संपून गेली.
बरे झाले, पिचलेल्या बांधवांच्या अपेक्षांचा अंत झाला.
बिचारे नुसतीच आशा लावून होते तुमच्याकडून
बुद्धाच्या करुणेने.
तुम्ही मात्र निमगांडू
बाबांनी स्वप्नं दिलीत.
संपूर्ण समाजच स्वप्ने बघू लागला
तुम्ही स्वप्नाच्या गाडीत चढले अन् अदृश्य झाले.
वेळेची महिमा ! दुसरं काय ?
तुमचे तर व्यवस्थित पार पडले
आता शरीरावर चढलेले चरबीयुक्त मांस
आणि ढेरपोट घेऊन तुम्ही
सपत्नीक विपश्यना करता - चांगलं करता !
यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही .
बाबासाहेबांच्या तथाकथित उन्नत समाजाला बघत
गिधाडं सुकल्या पिंपळावरुन वाट बघत आहेत
लचके तोडण्याची.
जागतिकीकरण, खाजगीकरण, आरक्षण बंद वगैरेचे
फासे फेकलेच आहेत सवजावर त्यांनी
कॅलिबरचच्या फसव्या चकव्याखाली
ते ओढताहेत प्राणवायूच्या नळया/
हवालदिल 'समाज' आचके देतो आहे शेवटचे
तुमचे तर ठीक आहे झाले
तुम्हाला तेव्हाही वेळ नव्हता आणि आताही;
मागे वळून बघण्यास.
तुमची विपश्यना व्यवस्थित सुरू ठेवा .
मुळीच शरमू नका.. यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही.
तुम्ही आपली विपश्यना बिनधास्त सुरू ठेवा .
मृत्यू जवळ आला की नाकर्ता माणूस धार्मिकच होतो
यात लाज शरम वाटण्यासारखे काहीच नाही.
स्वप्नं बघण्याच्या दिवसातच तुम्ही बांधवांसोबत नव्हते
आता तर स्वप्नच उद्ध्वस्त होण्याची वेळ आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon