मला बंदिस्त करू पहातायत .
त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन,अष्टकोन
या दृष्टिकोनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात.
मेली नाही म्हणूनच जगणारी ही विक्षिप्त माणसं
मला ओरबाडून करू पहातयात आपल्यासारखं
मी वाहतोय त्यांच्या मुक्तीचे दगड मोठाले .
ते हासतायत मी विरुद्ध दिशेने येतोय म्हणून
अन् प्रयत्न करताहेत ओढण्याचा आपल्यासोबत.
घालू पहातहेत एका तथाकथित फुंकणीतून सरसकट.
मी आहे जन्मजात क्षतिग्रस्त.
समूहगीत गाणं मला जमत नाही ,
जमत नाही आवाजात आवाज मिळवणं
धावता येत नाही सर्वांसोबत, तकलादू धर्म अध्यात्मामागं .
मी सत्त्व रोखून आहे. माझ्या परीने माझ्यापुरतं
सांभाळून आहे एक छोटासा स्वतःचा क्रूस ,
ज्यात तुडुंब भरला आहे मांवमुक्तीचा आग्रह .
सगळ्यांचे अस्तित्व.
कोणत्याही कोनात होऊ शकत नाही मी बंदिस्त
मी आहे एक अमर्याद संपूर्ण वर्तुळ.
ConversionConversion EmoticonEmoticon